तिर्थोदक तृप्तीचे, माझे वसंतकाका.
तिर्थोदक तृप्तीचे--वसंत काका माझे....⛳⛳
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे |
गोरटे कीं सावळे या मोल नाही फारसे ||
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती |
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ||
देखणे ते हात ज्यांना निर्मितीची डोहळे ||
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळा ||
देखणी ती जीवने जी तृप्तीची तिर्थोदके |
चांदणे ज्यातून वाहे शुद्ध पार्यासारखे ||
देखणा देहान्त जो तो सागरी सुर्यास्तसा |
अग्नीची पेरून जातो रात्रगर्भी वारसा ||
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या कविते मधील या काव्यपंक्ती ज्यांच्या जीवनास तंतोतंत लागू होतात ते
माझे सर्वात धाकटे चुलते वै.वसंतराव भगवान उत्पात तथा आमचा बाळकाका दि.१४-६-२०२४ रोजी अचानकच आपल्या वयाच्या ७९ व्या वर्षी इहलोकीची संपंन्न जीवनयात्रा आटोपून अनंताचे प्रवासास निघून गेला.
``चिठ्ठी ना कोई संदेस''
माणूस किती जगला या पेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे.असे म्हणतात किं,जन्म आणि मृत्यु ईश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवले आहेत.आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.परंतु मिळालेले जीवन कसे जगायचे हे मात्र माणसाच्या हातात आहे.आणि तेच जीवन उत्तम पणे जगले आणि जीवनाचे सार्थक केले.दुपारचे जेवण घेतले आपल्या डाॅक्टर मुलाला ड्युटीवर जायला सांगितले आणि दुपारी अचानकच गेलेही..
त्यामुळे एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात समाधान अशी आमची विचित्र अवस्था झाली. कारण हल्ली असे उठाउठी ते ही नैसर्गिकरित्या मृत्यु झालेली उदाहरण क्वचितच पहायला मिळतात.
हाॅस्पिटल मधे,नाका तोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत पडून रहायचे आणि एक दिवस डाॅक्टरांनी आमचे प्रयत्न थांबले घरी घेऊन जा म्हणायचे.असे आपल्याला जायचे नाही असे ते नेहमी म्हणायचे ते त्यांनी खरे करून दाखविले.
*``वीर पहावा रणी । साधू पहावा मरणी ।।''*
साधूचे जीवन जगायला भगवी वस्त्रेच परिधान केली पाहिजेत असें नाही तर प्रपंचात राहून,जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील आनंद घेऊनही साधूचे जीवन जगता येते हे त्यांनी दाखवून दिले.
पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयात विद्यार्थीप्रिय व ख्यातकीर्त शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला.
साहित्य,संगीत,नाट्य,कला व क्रिडा क्षेत्रात लिलया मुशाफिरी करणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ते पंढरपूर व परिसरात सुपरिचित होते.पंढरपूर काॅलेज मधे असतानां काॅलेज जीवनात त्यांनी अनेक नाटके बसवली व काॅलेज ला बक्षिसे मिळवून दिली कोल्हापूर विद्यापीठापर्यंत त्यांची नाटके गेली व गाजली. ``करायला गेलो एक'', ``काका किशाचा'' या नाटकातील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या त्याकाळात त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळाली.पूणे, मुंबई सारख्या शहरात ते असते तर त्यांना या क्षेत्रात खूप वाव मिळाला असता.परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही ..नाटका सोबतच ते उत्तम क्रिकेट खेळत असत.त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
1987 साली लोकमान्य विद्यालयात शताब्दी वर्षामधे त्यांनी ``करायला गेलो एक'' हे नाटक बसविले त्या नाटका मधे त्यांनी स्वतः काम करून ते सादर केले आणि छंद जोपासायला वा कोणतीही कला सादर करायला वयाचे बंधन आड येत नाही हे त्यांनी दाखवून दिले होते होते.
सेवानिवृत्ती नंतर अफाट वाचन, लेखन,मित्र परिवारात गप्पा मारणे, कौटुंबिक परिवारासह सहलीला जाणे,प्रवास वर्णने लिहीणे अशा पद्धतीने आपला सारा वेळ सत्कारणी लावला व जीवनाचा आनंद मनमुराद घेतला.
आपल्या मुलांच्या प्रपंचात फारसे लक्ष न घालता सेवानिवृत्तीचा काळ कसा व्यतीत करावा याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे माझे काका...
`जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी शिकवावे''
या उक्ती प्रमाणे त्यांचा जीवन प्रवास चालू होता.मोरोपंतांच्या केकावलीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. मोरोपंतांच्या केकावलीचे अभ्यासपूर्ण विवेचन अर्थासहित फेसबूकच्या माध्यमातून ते सादर करीत असत. त्यामधे त्यांच्या अंगीचा साहित्य गूण प्रतीत होतो.अनेकांना त्याचा खूप लाभ झाला.सोशलमिडिया वर ते सतत अॅक्टीव्ह असायचे.इंटरनेटचा चांगला वापर करून आपले जवळ जे जे चांगले विचार आहेत ते सतत देत असत.अभ्यासकाला त्यायोगे प्रेरणा मिळायची.चालू राजकीय,सामाजिक परिस्थितीवर नेमके व योग्य भाष्य करायचे.ते हजरजबाबी व विनोद बुध्दीचे होते.गंभीर चर्चा चालू असताना एखादी कोटी करून ते वातावरण हलके-फुलके करत असत.
त्यांचा लहानपणीचा काळ थोडा दारिद्र्यात गेला परंतू त्याचे भांडवल न करता त्यांनी उत्तम शिक्षण घेतले आणि ``जोडोनिया धन उत्तम व्यवहारे''
या संतवचनास अनुसरून उत्तम नोकरी करून सन्मार्गाने पैसा मिळविला व खर्चही त्याच मार्गाने केला.आमच्या कै.सुनंदा काकूंची ही साथ त्यांना चांगली मिळाली.
मुलांना उत्तम शिक्षण दिले मुलांच्या बरोबर आम्हाला ही शिक्षण दिले वेळोवेळी मदत केली.त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणी मनी रुंजी घालतात.माझ्या वडिलांना पाच भाऊ पैकी ते सर्वात धाकटे बंधू सर्व भावांचे एकमेकांवर अलौकिक असे प्रेम होते.वडिलांच्या पिढीतील सध्या ते एकटेच हयात होते.त्यामुळे कौटुंबिक आधार असायचा योग्य सल्ला द्यायचे.
`जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले'
वृत्तीने धार्मिक असणाऱ्या या माझ्या काकांना लौकिकार्थाने संसारात अपेक्षित असणारे सर्व सुखाचा लाभ झाला परमेश्वराची ही कृपाच आहे असे मला वाटते.
दररोज संध्याकाळी फिरायला गेला किं,महाराजा बेकरीतून मोठा `मिल्क ब्रेड' आणायचा त्यामधील मिळणाऱ्या एका स्लाईसची बरोबरी आज शब्दात कशी व्यक्त करता येणार?
`आठवण' हा शब्दच असा आहे कि माणसाला कातर करतो.त्या त्या वेळीचे प्रसंग जरी छोटे छोटे असले तरी मन हेलावून जाते...
शाळेत शिकत असताना आम्हाला म्हणायचा, *,`समोर तारा एकच आणि पायतळी अंगार''*
अनंत आठवणी मनी रुंजी घालतात.
*``स्वर आले दुरूनि । जुळल्या सगळ्या आठवणी ।।''*
कितीही लिहिल्या/सांगितल्या तरी काहीतरी कमी रहाणारच.
शेवटपर्यंत तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्या अंगी होता.आणि त्याच उत्साहात ते आम्हा सर्वांना सोडून गेले.
ते श्री रूक्मिणी मातेचे निस्सीम भक्त होते. त्यांना सद्गती प्राप्त होवो हीच भगवती श्री रूक्मिणी मातेचे चरणी प्रार्थना....🙏🎊
🙏🏻``भावपूर्ण आदरांजली''🙏🏻
🌹! हेमंत उत्पात ! 🌹
पंढरपूर
🚩


तुमचे उत्पात काका म्हणजे आमचे उत्पात सर. जवळपास 28 वर्षे आमचे शेजारी आमच्या दत्तनगर सोसायटीचे एक आधारस्तंभ, मार्गदर्शक व अतिशय छान मनुष्य आम्ही गमावलेला आहे. त्यांची आठवण कायमच राहील. त्यांना सदगती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
ReplyDelete