औषध फवारणीमुळे पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील बागा जळाल्या, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
औषध फवारणीमुळे पंढरपूर व मोहोळ मधील द्राक्ष बागा जळाल्या
शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान
पंढरपूर-(प्रतिनिधी )आधीच नैसर्गिक बदलामुळे त्रस्त असलेल्या तालुक्यातील कासेगाव, अनवली व पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव या भागातील द्राक्ष उत्पादक, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी फवारलेल्या किटकनाशक फवारणीमुळे मोठे नुकसान झाले असून एकूण ५० एकरावरील बागा जळाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकां समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर फवारणी करण्यासाठी की नावाच्या किटकनाशक औषधाची फवारणी केली. मात्र सदर एकाच बॅचच्या पॅकिंगचे किटकनाशक औषधांमधून फवारणी केल्यामुळे कासेगावसह मोहोळ तालुक्यातील आढेगाव, पुळूज येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जळून गेल्या आहेत. यासह खरबूज, कलिंगडची बागही जळून गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या औषधाच्या फवारणीने पन्नास एकरापेक्षा जास्त बाग जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यामध्ये अनवली येथील पोपट शिवदास घोडके, समाधान अर्जुन घोडके, पांडुरंग शिवाजी कदम, धनाजी जनार्दन देशमुख, कासेगाव येथील वसंत दामु शिंदे, सदाशिव बाबा गवळी, अजिंक्य तानाजी देशमुख, अक्षय तानाजी देशमुख, नेहाल नेताजी देशमुख, संकेत सयाजी देशमुख, मोहोळ तालुक्यातील राजाराम बारबोले रा. आढेगाव व पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील काही शेतकऱ्यांचे देखील याच प्रकारे नुकसान झाले आहे.
सदर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व सदर कंपनीवर माल विक्रीसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व राज्य द्राक्ष बागायत संघ, सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment