शिवरंजनी कलागौरव पुरस्कार पंढरपूर येथील विख्यात गायक विनोद शेंडगे यांना प्रदान.


 शिवरंजनी कलागौरव पुरस्कार सोहळा येत्या सोमवारी.


*शिवरंजनीचा हा २६ वा वर्धापन दिन*


ज्येष्ठ गायकअजित कडकडे यांची उपस्थिती..!*

विनोद शेंडगे व बालगंधर्वभक्त एस एम पाटील पुरस्काराचे मानकरी.

पंढरपूर (प्रतिनिधी)

सोलापुर  येथील प्रख्यात शिवरंजनी वाद्यवृंदाचा दरवर्षी साजरा होणारा “कलागौरव पुरस्कार” सोहळा येत्या सोमवारी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित केला असून ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, अशी माहिती शिवरंजनीचे निर्माता समीर रणदिवे आणि दिग्दर्शक उन्मेष शहाणे यांनी दिली.


सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित शिवरंजनी पुरस्कार सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना रणदिवे - जैन पुढे म्हणाले की, “या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी गायक वा वादक कलाकाराला “शिवरंजनी कलागौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी पंढरपूर येथील संगीतकार व गायक विनोद शेंडगे यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच संगीत सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तीला *“शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार”*  देऊन गौरविले जाते. यावर्षी हा संगीत सेवा सन्मान सोलापुरातील बालगंधर्वांचे सच्चे भक्त कै. एस एम पाटील यांच्या परिवारास हा पुरस्कार दिला जाणार आहे. एस एम पाटील परिवाराच्यावतीने ॲड. रेवणसिध्द पाटील हे पुरस्कार स्वीकारतील. हे दोन्ही पुरस्कार पंडित अजित कडकडे यांच्या हस्ते दिले जातील. 


हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी निःशुल्क आहे. याच्या मोफत प्रवेशिका एस के कॉम्प्युटर, दत्ता चौक आणि प्रिती डायनिंग हॉल, दंडवते महाराज मठाजवळ, एम्प्लॉयमेंट चौकाजवळ, सोलापूर  येथे उपलब्ध आहेत, अशी माहिती समीर जैन - रणदिवे यांनी दिली.

*शिवरंजनी कलागौरव पुरस्कार*


शिवरंजनी वाद्यवृंदाने आपल्या दहाव्या वर्धापन दिनापासून या पुरस्काराची सुरुवात केली. पुरस्काराचं यंदाचं १५ वर्ष आहे. दरवर्षी होणाऱ्या या संगीतमय सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित केले जाते. आजवर प्रभाकर पणशीकर, फैय्याज, शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर, डॉ. गिरीश ओक, पं. आनंद भाटे, उत्तरा केळकर अशा अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे उषाताई मंगेशकर आणि पं. ह्रदयनाथ मंगेशकर या दोन्ही भावंडांनी या कलागौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून शिवरंजनीचे कौतुक केले.

 

*अजीब दास्तॉं* विशेष कार्यक्रम.


या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवरंजनी वाद्यवृंदाच्यावतीने विशिष्ट थिम घेऊन कार्यक्रम सादर केला जातो. यावर्षी प्रख्यात संगीतकार जोडी शंकर - जयकिशन यांच्या संगीतावर बेतलेला “अजीब दास्तां” हा सुरेल कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना उमेश मोहोळकर आणि विश्वास शाईवाले यांची असून संगीत संयोजनाची जबाबदारी समीर जैन - रणदिवे यांच्याकडे आहे. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन उन्मेष शहाणे यांचं आहे. गायक कलाकार - विश्वास शाईवाले, उन्मेष शहाणे, सुहास सदाफुले, राजगंधर्व सदाफुले, वीणा बादरायणी, धनश्री देशपांडे, अपूर्वा शहाणे, स्वरदा मोहोळकर. वादक कलाकार - समीर जैन - रणदिवे, अविनाश इनामदार, उमेश मोहोळकर, समीत येवलेकर, सन्मीत जैन - रणदिवे, धनंजय अंबेकर, सचिन वाघमारे, करण भोसले, विनोद सावंत, उध्दव जाधव. 


*विनोद शेंडगे* - परिचय


विनोद शेंडगे हे ग्वाल्हेर घराण्याचे गायक असून डॉ. विकास कशाळकर यांचे ते शिष्य आहेत. पंढरपूर येथे त्यांचा अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओ असून त्यांनी टी सिरिज, विंग्ज अशा सीडी कंपन्यांसाठी गायन, संगीत आणि रेकॉर्डिंगची कामे केली. गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात प्रसिध्दी मिळवली आहे. साईबाबा - श्रध्दा आणि सबुरी, गजानन महाराज शेगावीचे, दार उधड बये दार उघड अशा अनेक टीव्ही मालिकांसाठी संगीत दिग्दर्शन, गायन, अभिनयही केला आहे. विनोद शेंडगे यांना गायक अजित कडकडे यांच्या हस्ते २०२३ चा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

 

*बालगंधर्वभक्त एस एम पाटील परिवार*


बालगंधर्वभक्त एस एम पाटील परिवार

यंदाचा “शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार” सोलापुरातील बालगंधर्वाचे परम भक्त कै. एस एम पाटील परिवारास देण्यात येत आहे. एस एम पाटील परिवाराने बालगंधर्वांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक संगीत नाटके सोलापुरात आणली. सोलापूरकरांना संगीत नाटकांची आणि नाट्यसंगीताची गोडी लावण्यात या परिवाराचा मोठा वाटा आहे.. कै. सिध्दा पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संगीत व नाट्यक्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या कलावंतांचा गौरव केला जातो. गेली ५० वर्षाहून अधिक काळ एका व्रताप्रमाणे हे कार्यक्रम चालू आहेत. या परिवाराच्या या कार्याचा सन्मान म्हणून शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्काराने गौरविले जात आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.