महाआरोग्य शिबिराचा भाविकांनी लाभ घ्यावा - डॉ राधाकिशन पवार.
महाआरोग्य शिबिराचा नागरिकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा
आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार.
कार्तिकी यात्रेसाठी ६५ एकर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी ) , कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात. यात्रेच्या कालावधीत सुमारे ८ ते १०लाख वारकरी पंढरपूर येथे येत असतात. या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ६५ एकर परिसर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक २२
२३ व २४या कालावधीत करण्यात आले आहे. या महा आरोग्य शिबीराचा जास्तीत-जास्त नगरिकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केले आहे.
महा आरोग्य शिबीर पुर्व नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले याच्यांसह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, चष्यांचे वाटप, इसीजी तपासणी मोफत केली जाणार आहे. महा आरोग्य शिबीरासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार असून यात विविध विभागातील मोठमोठ्या रूग्णालयातील हे सर्व तज्ञ डॉक्टर्स आहेत. यांच्याकडून तपासणी, औषधोपचार आणि गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील होणार आहेत.
महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याचबरोबर या शिबिरामध्ये आवश्यक शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, पार्कींग, स्वच्छता गृह, सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आरोग्य शिबीरात अतिदक्षता विभाग (ICU) सेंटर ६ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ३ प्राथमिक उपचार केंद्रे – ११, आरोग्य दूत २० रुग्णवाहिका ७, २४ तास वॉर रूम कार्यरत राहणार असून, शिबीरासाठी २ हजार ५०० आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी सांगितले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment